<strong>अहमदनगर</strong><strong>:</strong> गायरान जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर 11 जण जखमी झाले आहेत. पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावात ही घटना घडली. याप्रकरणी 51 जणांविरोधात पाथर्डी तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावात अनेक वर्षांपासून गायरान जमीन होती. या जमिनीत कंस पवार यांचे कुटंब शेती करत होते. मात्र या जमिनीवर जलसंधारणाचे काम करण्याचा निर्णय गावाने घेतला. त्यामुळे ग्रामस्थांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात अर्ज दिला. पण पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने, गावकऱ्यांनी जलसंधारणाचे काम करण्यासाठी गायरान जमिनीत थेट जेसीबीच नेला. पण पिकवलेली शेती उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पवार कुटुंबीयांनी ग्रामस्थांना विरोध केला. यावेळी पवार कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये वादावादी होऊन त्याचं रुपांतर जबर हाणामारीत झालं. या मारहाणीत 12 जण जखमी झाले. जखमींपैकी कंस पवार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान कंस पवार यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता आरोपींना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पवार कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान कंस पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात तब्बल 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण पोलिसांनी आधीच ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेतली असती, तर माराहाण टाळता आली असती, शिवाय एकाचा जीवही वाचला असता, अशी भावना व्यक्त होत आहे.
from home https://ift.tt/2wowEma
No comments:
Post a Comment