लंडन: इंग्लंडचा महान फलंदाज अॅलिस्टर कूक आज अखेरचा मैदानात उतरणार आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानातून तो क्रिकेटला गुडबाय करेल. शेवटच्या कसोटीत शेवटच्या डावात शतक ठोकून कूकने आपलं करिअर यादगार केलं. कूकसाठी आजचा दिवस खास आहे. एकीकडे क्रिकेट कारकीर्दीला गुडबाय करण्याचं दु:ख आहेच, पण कूकला आजच एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कूकच्या घरी नवा पाहुणा येऊ शकतो. कूकची पत्नी एलिस हंट तिसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी कूकच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी 11 सप्टेंबर ही तारीख दिली आहे. जर एलिस हंटने आज बाळाला जन्म दिला, तर कूकसाठी आजचा दिवस संस्मरणीय ठरेल. कूक आणि एलिस हंटने 2012 मध्ये लगीनगाठ बांधली. अनेकवेळा एलिस आपल्या मुलांसह मैदानात उपस्थित राहून, कूकला प्रोत्साहन देत असते. कूकचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक हा कसोटी पदार्पणात आणि कारकीर्दीतल्या अखेरच्या कसोटीतही शतक झळकावणारा जगातला पाचवा फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्धच्या ओव्हल कसोटीत खेळून आपण निवृत्त होणार असल्याचं कूकनं आधीच जाहीर केलं आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात कूकनं 71 धावांची खेळी उभारली होती. त्यानं दुसऱ्या डावात शतक ठोकून इंग्लंडच्या धावसंख्येला मजबुती दिली. विशेष म्हणजे कूकनं 2006 साली भारत दौऱ्यातल्या नागपूर कसोटीत शतक झळकावून आपलं पदार्पण साजरं केलं होतं.  भारताची घसरगुंडी ज्यो रुटच्या इंग्लंडनं ओव्हल कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी 464 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं असून, त्या आव्हानाच्या दडपणाखाली भारताची तीन बाद 58 अशी घसरगुंडी उडाली आहे. जेम्स अँडरसननं शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा या दोघांना एकाच षटकात पायचीत केलं. मग स्टुअर्ट ब्रॉडनं कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळं टीम इंडियाची अवस्था तीन बाद 2 अशी केविलवाणी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं भारताचा डाव तीन बाद 58 असा सावरून धरला आहे.
from home https://ift.tt/2OaMcAR
No comments:
Post a Comment