<strong>पालघर</strong> : डहाणूचे माजी नगराध्यक्ष ईश्वर किशन धोडी यांचं डहाणू रोड रेल्वे स्थानकामध्ये अपघाती निधन झालं. ते रेल्वेतून उतरत असताना पडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात घडला. धोडी यांचा जागीच मृत्यू झाल्याने उपचाराची संधी देखील मिळू शकली नाही. रेल्वे पोलिसांकडून पंचनामा केला जात असून शव विच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकणार आहे. ईश्वर धोडी हे शिवसेनेच्या तिकिटावर थेट नगराध्यक्ष पदावर निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते. त्यांच्यानंतर शिवसेनेला डहाणू नगरपालिकेची सत्ता मिळवता आलेली नाही. धोडी यांनी शिवसेनेतर्फे सातत्याने विधानसभा निवडणूक लढवली असली तरी त्यांना त्यात यश आलं नव्हतं. काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द सुरु केलेल्या धोडी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते शिवसेनेशी कायम निष्ठावान राहिले. अलीकडे ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नव्हते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर धोडी यांना रात्री आठच्या सुमारास काही प्रत्यक्षदर्शींनी डहाणू रोड स्थानकाच्या पूर्वेला पाहिलं होतं. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असाही तर्क लावला जात आहे, मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील तपास सुरु आहे.
from home https://ift.tt/2CIjeqI
No comments:
Post a Comment